प्रतिनिधी : अमर पठारे
महाराष्ट्र राज्य NEET पेपरफुटी प्रकरणाने आता महाराष्ट्रासह देशभरात मोठा राजकीय आणि शैक्षणिक भूकंप घडवला आहे. RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना अटक करण्यात आल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मॉक टेस्टमधील तब्बल 42 प्रश्न थेट NEET परीक्षेत आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, लाखो रुपयांच्या व्यवहारांचीही चर्चा रंगली आहे. CBI च्या पथकाने लातूरमध्ये धडक कारवाई करत महत्त्वाचे दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. तपासादरम्यान काही धक्कादायक नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्या या प्रकारामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “पेपरफुटी माफियांवर कठोर कारवाई करा” अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, या प्रकरणाचे धागेदोरे राज्याबाहेरील नेटवर्कशी जोडले गेले असल्याची चर्चा सुरू असून, तपास यंत्रणा आता अधिक सतर्क झाली आहे. पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









