
{विद्यार्थ्यांसमवेत प्रा. डॉ. नितीन कदम व प्राचार्य ताजुद्दीन सय्यद}
वाई,दि. 10 : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत दिशा पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कल्पतरू हॉल येथे आयोजित कार्यशाळेत शाडू मातीपासून आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या. इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
विद्यार्थ्यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला. घरगुती पद्धतीने विसर्जन करून त्यातून मिळालेल्या मातीचा वृक्षलागवडीसाठी उपयोग करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. ‘एक गणपती, एक झाड’ हा संदेश या उपक्रमाचा केंद्रबिंदू ठरला.
कृष्णा नदीसह नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण रोखणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता व सामाजिक जबाबदारी निर्माण करणे, हा उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम घडवत विद्यार्थ्यांनी ‘जय गणेश, जय कृष्णामाई’ असा पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
सुमन एज्युकेशन संस्थेच्या दिशा पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वाटचालीस संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम व सचिव प्रा. रूपाली कदम यांचे मार्गदर्शन लाभत आहे. प्राचार्य ताजुद्दीन सय्यद, ॲडमिन हेड सारिका चव्हाण व अकॅडमी हेड अनुपम गांधी यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.

प्रा.डॉ. नितीन कदम:
“पर्यावरण संवर्धनाची सवय विद्यार्थीदशेपासूनच रुजणे आवश्यक आहे. सण-उत्सव साजरे करताना निसर्गाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. शाडू मातीच्या गणेशमूर्ती आणि ‘एक गणपती, एक झाड’ यांसारख्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयीची जाणीव अधिक दृढ होईल. तसेच कृष्णामाईसह आपल्या नैसर्गिक जलस्रोतांच्या संरक्षणासाठी समाजात सकारात्मक संदेश जाईल.








