प्राचीन ऐतिहासिक शिव मंदिराचा मनमोहक देखावा; थिटे पाटील कुटुंबीयांच्या कलाकृतीला परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

भोर : हातवे बु येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध ठिकाणी आकर्षक सजावट आणि देखावे साकारले जात असताना, राजेंद्र विठ्ठलराव थिटे पाटील यांनी आपल्या घरी साकारलेला प्राचीन ऐतिहासिक शिव मंदिराचा काल्पनिक देखावा परिसरातील नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. अत्यंत बारकाईने, कल्पकतेने आणि कलात्मक पद्धतीने साकारलेल्या या देखाव्यामुळे शिवभक्त तसेच गणेशभक्तांना एक आगळावेगळा आध्यात्मिक अनुभव मिळत आहे.
या देखाव्याच्या निर्मितीसाठी त्यांचे चिरंजीव रोहन थिटे यांनी तब्बल तीन महिने अथक परिश्रम घेतले( कॉलेज करत असल्यामुळे वेळ मिळेल त्यानुसार). मंदिरातील प्रत्येक घटकाची रचना आणि सजावट करताना त्यांनी घेतलेली मेहनत या देखाव्यात स्पष्टपणे जाणवते.
देखाव्यामध्ये प्राचीन शिव मंदिर साकारण्यात आले असून, मंदिराच्या गाभाऱ्यात सुंदर शिवलिंग, त्यावर विराजमान नागदेवता आणि समोर भक्तिभावाने बसलेला नंदी साकारण्यात आला आहे. मंदिराचे खांब, महिरप, गाभारा तसेच इतर वास्तुशिल्पीय बारकावे अत्यंत कलात्मक पद्धतीने तयार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मंदिराचे छत खुले स्वरूपात दाखवण्यात आले असून, त्यामुळे संपूर्ण गाभारा आणि मंदिराची रचना अधिक प्रभावीपणे पाहता येते.
या देखाव्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे प्रसन्न, सुबक आणि सुंदर गणेशमूर्ती. शिवमंदिराच्या पार्श्वभूमीवर विराजमान झालेली गणेशमूर्ती संपूर्ण देखाव्याचे सौंदर्य अधिक खुलवते. मंदिरात प्रवेश केल्यानंतर प्रसन्न आणि भक्तिमय वातावरणाची अनुभूती येते.
देवाच्या कृपेचा अनोखा अनुभव
या देखाव्याच्या निमित्ताने थिटे पाटील कुटुंबीयांना एक आगळा आणि भावनिक अनुभवही आला. गणेशोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी अचानक त्यांच्या घरासमोर जिवंत कासव आले. विशेष म्हणजे मंदिराच्या देखाव्यामध्ये कासवाचा समावेश करायचा राहून गेला होता. मात्र, अचानक घरासमोर कासव आल्याने कुटुंबीयांनी हा योगायोग नसून देवानेच अपूर्ण राहिलेली गोष्ट पूर्ण करून घेतल्याची भावना व्यक्त केली.
या जिवंत कासवाला काही काळ सुरक्षित ठेवून, त्यानंतर बनेश्वर येथील तलावात सोडण्यात येणार असल्याचे थिटे पाटील कुटुंबीयांनी सांगितले. कासवाचे आगमन हा देखाव्याशी जोडलेला एक भावनिक आणि श्रद्धेचा अनुभव ठरला आहे.
या सुंदर आणि मनमोहक देखाव्याची माहिती परिसरात पसरताच नागरिक, शिवभक्त आणि गणेशभक्त मोठ्या उत्सुकतेने थिटे पाटील यांच्या घरी जाऊन दर्शन घेत आहेत. प्राचीन शिव मंदिराची भव्यता, गणेशमूर्तीचे सौंदर्य, कलात्मक बारकावे आणि त्यामागील तीन महिन्यांची मेहनत यामुळे हा देखावा परिसरातील आकर्षणाचे केंद्र बनला आहे.
भक्ती, कला, कल्पकता आणि अथक परिश्रम यांचा सुंदर संगम असलेला हा देखावा गणेशोत्सवातील एक मनमोहक अनुभव ठरत आहे

Leave a Comment

Traffic Tail