विद्या निकेतनच्या श्रावणी सपकळची तालुकास्तरीय स्पर्धेत उपविजेतेपदावर झेप
पाचगणी : बुद्धिबळाच्या पटावर प्रत्येक चाल विचारपूर्वक खेळावी लागते… आणि याच विचारशक्ती, संयम व आत्मविश्वासाच्या जोरावर विद्या निकेतन हायस्कूलच्या श्रावणी सपकळने तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत दमदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला.
कोव्हेंट हायस्कूल, पाचगणी यांच्या आयोजनाखाली झालेल्या १४ वर्षांखालील मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत श्रावणीने आपल्या खेळातील कौशल्याची छाप उमटवली. प्रतिस्पर्ध्यांच्या प्रत्येक चालीवर बारकाईने लक्ष ठेवत योग्य वेळी अचूक चाल खेळत तिने तालुक्यातील उपविजेतेपदावर आपले नाव कोरले.
श्रावणीच्या या यशामुळे विद्या निकेतन हायस्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. बुद्धिबळासारख्या खेळातून विद्यार्थ्यांची एकाग्रता, निर्णयक्षमता आणि तर्कशक्ती विकसित होत असून, अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना मोठे व्यासपीठ मिळत असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्राचार्य अथर्व बिरामणे सर, ॲडमिनिस्ट्रेटर स्वाती बिरामणे आणि क्रीडा शिक्षक नितीन सपकळ यांनी श्रावणीचे अभिनंदन केले. ‘पटावरची एक अचूक चाल आणि यशाची नवी वाट!’ या कामगिरीने श्रावणीने आपल्या शाळेचे नाव तालुकास्तरावर उज्ज्वल केले आहे.








