कृषी-अन्न क्षेत्रातील नवोपक्रम, संशोधन आणि राष्ट्रसेवेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल
कोलकाता : कृषी-अन्न क्षेत्रात नावीन्यपूर्ण संशोधन आणि नवोपक्रमाला चालना देण्याच्या उद्देशाने मॅग्नस फार्म्सचे सर्वेसर्वा श्री. लक्ष्मण सावळकर यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कोलकाता येथे आयोजित TA-2.0 परिषदेदरम्यान मॅग्नस फार्म्स आणि टेरिटोरियल आर्मी इनोव्हेशन सेल (TAIC) यांच्यात सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी करण्यात आली.
या सामंजस्य करारामुळे कृषी आणि अन्न क्षेत्रातील कौशल्य, संशोधन, तंत्रज्ञान, नवोपक्रम तसेच राष्ट्रसेवेची भावना यांचा समन्वय साधण्यास मोठी मदत होणार आहे. शेतकी क्षेत्रासमोरील विविध आव्हानांवर आधुनिक तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून उपाय शोधण्याच्या दिशेने हा करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मॅग्नस फार्म्सच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील नवीन संकल्पना, संशोधन आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देत शेतकरी आणि कृषी-अन्न उद्योगासाठी उपयुक्त उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. TAIC सोबत झालेल्या या करारामुळे या प्रयत्नांना संस्थात्मक आणि व्यापक व्यासपीठ मिळण्याची अपेक्षा आहे.
श्री. लक्ष्मण सावळकर यांच्या व्यावसायिक प्रवासातील हा करार एक नवा अध्याय मानला जात असून, कृषी क्षेत्राच्या विकासासोबतच आत्मनिर्भर आणि बलशाली भारताच्या निर्मितीसाठी योगदान देण्याची दिशा या माध्यमातून अधोरेखित झाली आहे.
कृषी क्षेत्रात कौशल्य, संशोधन आणि नवोपक्रमाची सांगड घालत ‘शेतकी क्षेत्रासाठी नावीन्यपूर्ण संशोधन आणि बलशाली भारतासाठी योगदान’ या व्यापक उद्देशाने मॅग्नस फार्म्सची वाटचाल सुरू असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट झाले आहे.








