दिशाच्या गुणवंत विद्यार्थ्यांची आज वाईत विजय रॅली

वाई प्रतिनिधी

वाई, दि. 29 : दिशा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या विद्यार्थ्यांनी JEE, NEET, MHT-CET, शिष्यवृत्ती परीक्षा तसेच विविध फाउंडेशन व ऑलिंपियाड परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी वाई शहरातून आज सायंकाळी ४ ते ७ या वेळेत भव्य विजय रॅली काढण्यात येणार आहे.

सलग आठव्या वर्षी दिशाच्या विद्यार्थ्यांनी विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय परीक्षांमध्ये आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. JEE Main व Advanced परीक्षेत अनेक विद्यार्थी पात्र ठरले असून, NEETमध्येही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. MHT-CET परीक्षेत विद्यार्थ्यांनी ९९ टक्क्यांहून अधिक गुण मिळवत अभियांत्रिकी प्रवेशासाठी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीतही दिशाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय स्थान मिळविले आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल दिशा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे संस्थापक प्रा. डॉ. नितीन कदम व सचिव प्रा. रुपाली कदम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांची मेहनत, सातत्य, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे हे यश शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी आयोजित या विजय रॅलीत विद्यार्थी, पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी तसेच वाईकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन दिशा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Comment

Traffic Tail