प्रतिनिधी : अमर पठारे
झोडगे येथील जनता एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष स्व. दादासाहेब राघोजी देसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव, बक्षीस वितरण व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप सोहळा उत्साहात पार पडला. शिक्षण हे केवळ उपजीविकेचे साधन नसून आदर्श समाज घडविण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन प्रमुख पाहुणे कवी तुषार शिल्लक यांनी केले.
या कार्यक्रमाला शाळेच्या माजी विद्यार्थिनी तथा युवा पोलिस मित्र राष्ट्रीय यवती अध्यक्ष श्रीमती जयश्रीताई आहिरे प्रमुख उपस्थित होत्या. आपल्या मनोगतात त्यांनी शाळेतील शिक्षण, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि बालपणीच्या आठवणींना उजाळा देत, “या शाळेने दिलेले संस्कार आणि मूल्ये माझ्या आयुष्याचा मजबूत पाया ठरले,” अशा भावना व्यक्त केल्या. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
याचवेळी श्रीमती जयश्रीताई आहिरे यांनी शाळेच्या विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शाळेला भरघोस आर्थिक मदत जाहीर केली. त्यांच्या या सामाजिक योगदानाबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले. तसेच विद्यमान चेअरमन श्रीमती शितलताई देसले यांच्या हस्ते जयश्रीताई आहिरे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पारोळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर चेअरमन श्रीमती शितलताई देसले, माजी चेअरमन दत्तात्रय शिरोडे, सचिव निळकंठ देसले, संचालक छगन पिंगळे, खजिनदार पांडुरंग सोनवणे, सरपंच बाळासाहेब देसाई, नय्युजी देसले, हभप प्रकाश गांगुर्डे, उपप्राचार्य सुधीर देसाई, सरोज देवरे, विदुलराव देशमुख, डॉ. नरेंद्र देवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र शिरसाठ, मुकेश देसाई व हेमंत परदेशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक दीपक देशमुख, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच जनता एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप आणि माजी विद्यार्थ्यांचा शाळेशी असलेला जिव्हाळा याचे प्रेरणादायी दर्शन घडले. जयश्रीताई आहिरे यांनी शाळेला केलेली भरघोस मदत ही संस्थेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निश्चितच मोलाची ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.









