पालिकेच्या निष्क्रियतेचा ‘घोडा’ आता लोकप्रतिनिधींच्याच दारात; पाचगणीत मोकाट जनावरांचा हैदोस, नागरिक संतप्त!

प्रतिनिधी पाचगणी :

पर्यटननगरी म्हणून देशभर ओळख असलेल्या पंचगणी शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. मुख्य रस्ते, बाजारपेठ, शाळा-महाविद्यालय परिसर, बसस्थानक आणि पर्यटनस्थळांवर मुक्तपणे फिरणाऱ्या घोडे, गायी आणि गाढवांमुळे नागरिकांसह पर्यटकांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक तक्रारी, आंदोलने आणि मागण्या करूनही पालिकेकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. या प्रश्नाचे गांभीर्य अधोरेखित करणारी धक्कादायक घटना नुकतीच समोर आली. एका लोकप्रतिनिधींच्याच घरात मध्यरात्री मोकाट घोड्याने थेट प्रवेश करून रात्रभर मुक्काम ठोकला. सकाळी घरातील सदस्य उठल्यानंतर घरात घोडा उभा असल्याचे दृश्य पाहून एकच गोंधळ उडाला. या घटनेमुळे “सामान्य नागरिकांची अवस्था काय असेल?” असा संतप्त सवाल आता पंचगणीकर उपस्थित करत आहेत. वाई–पंचगणी–महाबळेश्वर मार्गासह पंचगणी–गणेशपेठ रस्त्यावर मोकाट जनावरांचे कळप सातत्याने फिरत असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत.

वाहनचालकांना अचानक ब्रेक मारावे लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. मुख्य बाजारपेठ, भाजी मंडई, बसस्थानक, शाळा, महाविद्यालये आणि पर्यटनस्थळांवरही जनावरांचा मुक्त संचार सुरू असल्याने पादचारी, विद्यार्थी आणि पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वर्षांपासून मोकाट जनावरांविरोधात प्रभावी मोहीम राबविण्यात आलेली नाही. शहरात जनावरे पकडण्यासाठी अधिकृत कोंडवाड्याची व्यवस्था नेमकी कुठे आहे, याबाबतही स्पष्टता नसल्याने पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पर्यटननगरीची प्रतिमा मलिन करणारा आणि नागरिकांच्या जीविताशी थेट संबंधित असलेला हा प्रश्न तातडीने सोडवावा, मोकाट जनावरांना पकडून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, अन्यथा तीव्र लोकआंदोलन उभारण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. “रस्त्यावर सुरू झालेला मोकाट जनावरांचा उपद्रव आता लोकप्रतिनिधींच्या दारात पोहोचला आहे… आता तरी पंचगणी पालिका जागी होणार का?”

Leave a Comment

रॉयल एनफिल्डची गर्जना अनेकांनी ऐकली… पण यामाहाचा ‘किंग’ म्हणून देशभर दाद मिळवणारा हा भिलारचा मुलगा!” रस्त्यावर वेगाचा बादशहा… संकटात माणुसकीचा आधारवड – अमित दादा भिलारे यांचा प्रेरणादायी प्रवास

स्व. दादासाहेब देसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; माजी विद्यार्थिनी तथा युवा पोलिस पोलीस मित्र राष्ट्रीय युवती अध्यक्ष जयश्रीताई आहिरे यांच्याकडून शाळेला भरघोस मदत

Traffic Tail