प्रतिनिधी : अमर पठारे
पुणे : ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. बालाजी कल्याणे यांच्या संकल्पनेतून आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांसाठी भव्य विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, अखिल मंडई मंडळ, पुणे, शेतमाल व्यापारी संघटना, फळ मार्केट मंडई, पुणे तसेच युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत हे शिबिर उत्साहात पार पडले.
गेल्या दहा वर्षांपासून ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या सेवेसाठी सातत्याने आरोग्य सेवा देत असून, यंदाही हजारो वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली. शिबिरामध्ये नेत्र तपासणी, दंत तपासणी, रक्तातील साखरेची तपासणी, रक्तदाब तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी तसेच विनामूल्य औषधांचे वितरण करण्यात आले. या शिबिराचा लाभ तब्बल २,५७० वारकऱ्यांनी घेतला.
याच प्रसंगी माननीय श्री. किशनराव कल्याणे यांचा वाढदिवस वारकऱ्यांसमवेत केक कापून अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. हरिपाठ, भैरवी गवळण तसेच टाळ-मृदंगाच्या गजरात परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. महिला-पुरुष वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आणि या सोहळ्याचा आनंद लुटला.
माननीय श्री. किशनराव कल्याणे हे डॉ. बालाजी कल्याणे व श्री. योगेश कल्याणे यांचे वडील असून, सत्काराला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, “वारकऱ्यांच्या सान्निध्यात साजरा झालेला हा वाढदिवस माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय, प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारा दिवस ठरेल.”
ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी श्री. अनिल रेळेकर यांनी आभार प्रदर्शन करताना सांगितले की, माननीय श्री. किशनराव कल्याणे हे वारकरी संप्रदायाशी जोडलेले असून, वारकऱ्यांच्या सेवेसाठी आयोजित या पवित्र आरोग्य शिबिराच्या दिवशीच त्यांचा वाढदिवस येणे हा खऱ्या अर्थाने “दुग्धशर्करा योग” आहे. त्यांनी श्री. किशनराव कल्याणे यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावे व ते शतायुषी व्हावेत, अशा शुभेच्छाही दिल्या.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन श्री. योगेश कल्याणे व ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी, स्वयंसेवक, विविध संस्था व मित्रपरिवाराचा माननीय श्री. किशनराव कल्याणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हे भव्य आरोग्य शिबिर कै. सतीश धोंडीबा मिसाळ पार्किंग येथे आयोजित करण्यात आले होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी समर्पित ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भविष्यातही अशाच निष्ठेने व सेवाभावाने आरोग्य सेवा सुरू ठेवणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.









