पश्चिम भागाचा आधारवड हरपला; विकासद्रष्टे ज्ञानदेव (शेठ) सणस यांचे आकस्मिक निधन

वाई प्रतिनिधी : दि. 09

वाई तालुक्यातील रेणावळे गावचे सुपुत्र, काळेश्वरी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक, श्री काळेश्वरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक तथा पश्चिम भागाच्या विकासासाठी सातत्याने झटणारे ज्ञानदेव (शेठ) बाळू सणस (वय ६५) यांचे गुरुवारी आकस्मिक निधन झाले. पश्चिम भागाच्या विकासकामांसाठी ते गुरुवारी सकाळी वाई पंचायत समितीत आले असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. तत्काळ उपचारासाठी नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने रेणावळेसह संपूर्ण पश्चिम भागावर शोककळा पसरली असून समाजकारण, विकास आणि लोकसेवेसाठी झटणारे एक निस्वार्थ व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

ज्ञानदेव शेठ सणस हे शांत, संयमी आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून परिचित होते. रस्ते, पिण्याचे पाणी, शिक्षण, शेती, पर्यटन आणि ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांसाठी त्यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला. पश्चिम भागातील विकासकामांना गती मिळावी यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनेकवेळा भेट घेऊन विविध विकासकामांबाबत निवेदने सादर केली होती. मागील काही महिन्यांपासून ते शिवसेना पक्षातही सक्रिय होते.

काळेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्री काळेश्वरी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मदत, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे तसेच विविध शाळांना स्वखर्चाने शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले.

कोरोनाकाळात तसेच अतिवृष्टी, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी त्यांनी मदतकार्यात सक्रिय सहभाग घेतला. पश्चिम भागात भूस्खलनाच्या घटना घडल्या तेव्हाही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते मदतकार्यासाठी धावून गेले. आपत्तीग्रस्तांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आणि प्रशासनाला सहकार्य करून त्यांनी संकटसमयी लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका निभावली. त्यामुळे “संकटात धावून जाणारा समाजसेवक” अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती.

त्यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. पंचायत समितीचे सभापती विक्रांत भैय्यासाहेब डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे, पंचायत समिती सदस्य स्वप्निल भाई गायकवाड, विक्रम वाघ (मराठा महासंघ), बाळासाहेब चिरंगुटे, अशोक वाडकर, माजी उपसभापती चंद्रकांत शेलार, राजेंद्र शेलार, गणेश सणस, संतोष डगळे, आनंदा वाशिवले, ज्ञानबा मांढरे, कृष्णा नवघणे, संतोष कोंढाळकर, संतोष खरे, महेंद्र पुजारी, राजू जेधे आणि योगेश फाळके यांच्यासह अनेक मान्यवरांनी अंत्यसंस्कारस्थळी उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी 8 वाजता रेणावळे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते, नातेवाईक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्ञानदेव (शेठ) बाळू सणस यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन सुना, नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने केवळ रेणावळे गावाने नव्हे, तर वाईच्या संपूर्ण पश्चिम भागाने विकासासाठी झटणारा, समाजहिताला आयुष्य वाहिलेला आणि संकटात लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एक आधारवड गमावला आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा आणि विकासाची दूरदृष्टी पश्चिम भागातील जनतेच्या कायम स्मरणात राहील.

Leave a Comment

रॉयल एनफिल्डची गर्जना अनेकांनी ऐकली… पण यामाहाचा ‘किंग’ म्हणून देशभर दाद मिळवणारा हा भिलारचा मुलगा!” रस्त्यावर वेगाचा बादशहा… संकटात माणुसकीचा आधारवड – अमित दादा भिलारे यांचा प्रेरणादायी प्रवास

स्व. दादासाहेब देसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; माजी विद्यार्थिनी तथा युवा पोलिस पोलीस मित्र राष्ट्रीय युवती अध्यक्ष जयश्रीताई आहिरे यांच्याकडून शाळेला भरघोस मदत

Traffic Tail