प्रा. डॉ. नितीन कदम यांच्या संकल्पनेतून सामाजिक बांधिलकीचा उपक्रम
वाई प्रतिनिधी
वाई, ता. 13 : जागतिक रक्तदान दिनानिमित्त दिशा ज्युनिअर कॉलेज, वाई यांच्या वतीने सोमवार (ता. 15) रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार पेठ येथील कल्पतरू ऑडिटोरियम हॉलमध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत हे शिबिर होणार असून सातारा येथील बालाजी ब्लड बँकेचे सहकार्य लाभणार आहे.
दिशा अकॅडमी ही गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखली जाणारी संस्था असून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, सेवाभाव, माणुसकी आणि समाजाप्रती उत्तरदायित्वाची भावना रुजविण्यासाठी विविध उपक्रम राबवत असते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम यांच्या दूरदृष्टीतून आणि संस्थेच्या संचालिका प्रा. रूपाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच सामाजिक जाणीव निर्माण करणारे अनेक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. त्याच सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दिशा ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य ताजुद्दिन सय्यद सर, ॲडमिनिस्ट्रेटर सारिका चव्हाण मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने शिबिराच्या नियोजनाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. रक्तदानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविणे, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी हातभार लावणे आणि युवकांमध्ये सामाजिक उत्तरदायित्वाची भावना वृद्धिंगत करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते. एका रक्तदात्याच्या रक्तामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, थॅलेसेमिया व इतर गंभीर आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी रक्ताची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत रक्तदात्यांचे योगदान अमूल्य ठरते.
त्यामुळे वाई शहर व परिसरातील नागरिक, युवक-युवती, माजी विद्यार्थी, पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन रक्तदानाच्या माध्यमातून मानवतेच्या सेवायज्ञात सहभागी व्हावे, असे आवाहन दिशा ज्युनिअर कॉलेजच्या वतीने करण्यात आले आहे. शिबिर सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत रविवार पेठ येथील कल्पतरू ऑडिटोरियम हॉलमध्ये होणार असून सातारा येथील बालाजी ब्लड बँकेचे तज्ज्ञ पथक रक्तसंकलन करणार आहे.









