पुणे | प्रतिनिधी
नवी पेठ परिसरात भरधाव वेगाने धावणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका युवकाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कार चालकाविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संबंधित चालकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत नगर सोसायटी येथे राहणारे रुपेश अनिल हरपुडे (वय २५) हे २ जून रोजी रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या होंडा अॅक्टिव्हा (एमएच-१२ ईडब्ल्यू-५८००) या दुचाकीवरून कार्यालयातून घरी परतत होते.
नवी पेठ येथील छत्रपती संभाजी महाराज शाळेजवळ, लाल बहादूर शास्त्री रस्त्यावरून जात असताना पांढऱ्या रंगाच्या ह्युंदाई क्रेटा कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रुपेश हरपुडे यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने पुण्यातील रुग्णालयात दाखल केले.
सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र, फिर्यादी समीर अशोक हरपुडे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे विश्रामबाग पोलीस ठाण्यात अमोल सुभाष परांडे वय वर्षे 35 राहणार NDA रोड कोंढवे धावडे व नवनाथ तानाजी किवळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत संबंधित चालकाला ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. या घटनेचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.









