पांचगणीत पोलिसांचा ‘ऑपरेशन विश्वास’ रूट मार्च; बकरी ईदपूर्वी समाजकंटकांना कडक इशारा

पांचगणी, प्रतिनिधी :
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पांचगणी शहरात रविवारी सायंकाळी पोलीस प्रशासनाने काढलेल्या भव्य रूट मार्चने संपूर्ण शहराचे वातावरण काही काळ ‘हाय अलर्ट’मध्ये गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या शिस्तबद्ध संचलनाने नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली, तर समाजकंटकांच्या मनात धडकी भरली. सायंकाळच्या गर्दीच्या वेळी अचानक रस्त्यावर उतरलेले पोलीस अधिकारी, एमएसएफ जवान, होमगार्डचा ताफा आणि त्यांच्या हातातील सुरक्षा साहित्य पाहून अनेक नागरिक काही काळ थांबून हा रूट मार्च पाहत होते. “पोलिस सज्ज आहेत” हा स्पष्ट संदेश या शक्ती प्रदर्शनातून देण्यात आला. दि. २५ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.५० ते ७.३० या वेळेत पांचगणी पोलीस स्टेशन हद्दीत हा विशेष रूट मार्च पार पडला. जुने पोलीस स्टेशन येथून सुरुवात झालेला हा मार्च छत्रपती शिवाजी महाराज चौक, एस.टी. स्टँड, राहिल प्लाझा, जामा मशिद परिसरातून पुन्हा जुने पोलीस स्टेशन येथे दाखल झाला. रूट मार्चदरम्यान शहरातील मुख्य चौक, बाजारपेठ आणि संवेदनशील भागात विशेष लक्ष ठेवण्यात आले.
पोलिसांचा ताफा पुढे सरकत असताना अनेक व्यापारी, वाहनचालक आणि नागरिकांनी मोबाईलवर व्हिडिओ शूट करत या दृश्याची नोंद घेतली. काही ठिकाणी लहान मुलांनीही पोलिसांना सलाम करत उत्साह व्यक्त केला. विशेष म्हणजे, सणाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, अफवांना आळा बसावा आणि सामाजिक सलोखा कायम राहावा, यासाठी पांचगणी पोलीस प्रशासनाने आधीपासूनच कडक नियोजन केले आहे. या रूट मार्चमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था यंत्रणा पूर्णपणे सतर्क असल्याचे स्पष्ट झाले. या संचलनात १ पोलीस अधिकारी, १२ पोलीस अंमलदार, २६ होमगार्ड तसेच ९ एमएसएफ जवान सहभागी झाले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली हा रूट मार्च पार पडला. “सण आनंदात साजरे करा; मात्र कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अजिबात सूट दिली जाणार नाही,” असा कडक संदेश पोलिस प्रशासनाने या शक्ती प्रदर्शनातून दिल्याची चर्चा शहरभर रंगली होती.

Leave a Comment

रॉयल एनफिल्डची गर्जना अनेकांनी ऐकली… पण यामाहाचा ‘किंग’ म्हणून देशभर दाद मिळवणारा हा भिलारचा मुलगा!” रस्त्यावर वेगाचा बादशहा… संकटात माणुसकीचा आधारवड – अमित दादा भिलारे यांचा प्रेरणादायी प्रवास

स्व. दादासाहेब देसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; माजी विद्यार्थिनी तथा युवा पोलिस पोलीस मित्र राष्ट्रीय युवती अध्यक्ष जयश्रीताई आहिरे यांच्याकडून शाळेला भरघोस मदत

Traffic Tail