पत्रकार सलाउद्दीन शेख यांना ‘सामाजिक आदर्श पत्रकार पुरस्कार’ जाहीर
सांगली प्रतिनिधी:
सांगली, दि. ३० एप्रिल २०२६ — महात्मा अपंग बहुउद्देशी विकास कल्याणकारी संस्था, आओगलेवाडी (कराड) यांच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त दि. १ मे २०२६ रोजी सांगली येथे राज्यस्तरीय “महाराष्ट्र भूषण पुरस्कार” वितरण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. पद्मश्री वसंतदादा पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येणाऱ्या या सोहळ्यात राज्यभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यास बांधकाम मंत्री शिवाजीराव नाईक साहेब अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती जयश्रीताई मदन भाऊ पाटील (वहिनी) यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन सांगली-मिरजचे महापौर मा. श्री धीरज सूर्यवंशी यांच्या हस्ते होणार आहे. तसेच कैलास पाटील, अतुल माने, शाहीन शेख, श्रीमती वर्षाताई अमर निंबाळकर, महेश धोत्रे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार असून कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून जयंतराव जी घोरपडे कार्य पाहत आहेत.

या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या किमान पाच ते दहा मान्यवरांना “महाराष्ट्र भूषण पुरस्कार” प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये सोलापूर शहरातील वरिष्ठ पत्रकार सलाउद्दीन शेख यांना “सामाजिक आदर्श पत्रकार पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणे, जनजागृती करणे आणि समाजहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे या त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील फरतडे यांनी निवड समितीच्या वतीने सलाउद्दीन शेख यांना अधिकृत पत्र देऊन पुरस्काराची माहिती दिली असून त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्यात सर्व सन्मानितांना सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दि. १ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सांगली येथील नियोजन भवन, कलानगर, गोल्ड पार्क, महादेव नगर रोड येथे (पेट्रोल पंपाच्या मागे) पार पडणार आहे.
या भव्य सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.









