शिक्षक, लेखक आणि कलाकार म्हणून शिवाजी जाधव यांची बहुआयामी वाटचाल
पाचगणी : एका हातात पुस्तक, वर्गात विद्यार्थ्यांची गर्दी आणि दुसऱ्या बाजूला कॅमेऱ्यासमोर अभिनय… शिक्षकाची ओळख जपत कला, साहित्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे सेंट झेवियर्स स्कूल, पाचगणीचे हिंदी व मराठी विभागप्रमुख शिवाजी जाधव.
गेल्या २७ वर्षांपासून अध्यापन क्षेत्रात कार्यरत असलेल्या जाधव यांचा सेंट झेवियर्स स्कूलशी गेल्या २३ वर्षांपासून ऋणानुबंध आहे. विद्यार्थ्यांना केवळ विषय शिकविण्यापेक्षा त्यांच्यात विचार करण्याची आणि व्यक्त होण्याची क्षमता विकसित करण्यावर त्यांचा भर राहिला आहे.
शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत तज्ज्ञ समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. कोविड काळात NCERTच्या सहकार्याने हिंदी विषयाचा ब्रिज कोर्स विकसित करण्याच्या कार्यात त्यांचा सहभाग होता. २०१० मध्ये UMIND Europe Meet India Education Exchange Programme अंतर्गत युरोपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मानही त्यांना मिळाला.
‘शिक्षक’ ही ओळख सांभाळत असतानाच ‘कलाकार’ म्हणूनही त्यांनी आपली स्वतंत्र छाप पाडली. हिंदी दूरचित्रवाणी मालिकांसह मराठीतील ‘लाखात एक आमचा दादा’, ‘हुकमाची राणी ही’ आणि ‘देवमाणूस’ या मालिकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे त्यांचा प्रवास वर्गखोलीपासून छोट्या पडद्यापर्यंत पोहोचला आहे.
एम.ए. हिंदी, एम.ए. मराठी, बी.एड. आणि डी.एस.एम. अशी शैक्षणिक पात्रता असलेल्या जाधव यांच्या लेखणीलाही तितकीच धार आहे. ‘शिक्षण संक्रमण’ या शैक्षणिक मासिकासह विविध वर्तमानपत्रे व नियतकालिकांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत.
शिव छत्रपती महाराष्ट्र राज्य पुरस्कार, आदर्श शिक्षक, उत्कृष्ट शिक्षक, सुरभी उत्कृष्ट शिक्षक, कला गौरव यांसह विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. २०२५ मध्ये ध्येय फाउंडेशन उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार तसेच महाराष्ट्र राज्य हिंदी निबंध लेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून त्यांनी आपल्या कार्याची आणखी एक मोहोर उमटवली.
‘वर्गात शिक्षक, लेखणीत लेखक आणि कॅमेऱ्यासमोर कलाकार’—शिवाजी जाधव यांचा हा त्रिवेणी संगम शिक्षण क्षेत्रातील नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.








