‘युवक घडला तर गाव घडेल’; बावधनच्या तंटामुक्तीची धुरा दिलीप मांढरेंकडे

बावधन, दि. २५ : बावधन ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्षपदी दिलीप मांढरे यांनी ५१ सदस्यांसमवेत अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नवनिर्वाचित अध्यक्ष व सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.


गावातील वाद-विवाद सामोपचाराने व सामंजस्याने मिटवून बावधन गाव तंटामुक्त ठेवण्याचा निर्धार यावेळी अध्यक्ष व सदस्यांनी व्यक्त केला. पदभार स्वीकारताना दिलीप मांढरे म्हणाले, “गावातील प्रत्येक कुटुंब हे माझे कुटुंब आहे. कोणताही वाद पोलीस ठाण्यापर्यंत जाणार नाही, तो गावातच सामंजस्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करू. सर्व ५१ सदस्यांच्या सहकार्याने बावधनला आदर्श तंटामुक्त गाव बनवू.”
वाईचे नूतन पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी म्हणाले, “बावधन हे मोठे गाव आहे. गावाच्या विकासासाठी युवा पिढीकडे विशेष लक्ष देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. युवक घडला तर गाव घडेल. त्यामुळे युवकांना योग्य दिशा देण्यासाठी तंटामुक्ती समितीने पुढाकार घ्यावा.”
माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ यांनी दिलीप मांढरे यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “दिलीपदादा मांढरे हे आध्यात्मिक तसेच वारकरी संप्रदायाशी जोडलेले असल्याने ते गाव निश्चितच तंटामुक्त ठेवतील. त्यांच्या माध्यमातून गावात एकोपा निर्माण होईल तसेच युवकांना योग्य मार्गदर्शन मिळेल.”


यावेळी माजी कृषी सभापती शशिकांत पिसाळ, सरपंच वंदना कांबळे, पंचायत समिती सदस्य सचिन भोसले-पाटील, माजी पंचायत समिती सदस्य दीपक ननावरे, अॅड. दिप्तीताई पिसाळ, विक्रम वाघ, दिगंबर रासकर, अंकुश कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Traffic Tail