
-
वाई दि. 22 : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी) मध्ये जिल्हा परिषद केंद्र शाळा, एकसर येथील विद्यार्थिनी कु. ओजस्वी शुभांगी प्रमोद शिर्के हिने घवघवीत यश संपादन केले. तिने जिल्ह्यात ग्रामीण भागातून ७५ वा, तर शहरी भागातून २९ वा क्रमांक मिळवला. तसेच तालुक्यात ५ वा क्रमांक मिळवत आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली.
ओजस्वीला शाळेच्या मुख्याध्यापिका प्रभावती थोरवे तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तिचे आई-वडीलही शिक्षक असून, त्यांच्या मार्गदर्शनामुळे ओजस्वीने यापूर्वीही विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्ह्यात ७ वा, अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत ८ वा, अक्षरगंगा परीक्षेत जिल्ह्यात १ ला, तसेच बीडीएस परीक्षेत देशात ४३ वा क्रमांक मिळवून तिने आपल्या गुणवत्तेची सातत्याने चमक दाखवली आहे.
मोठे झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्याचे ओजस्वीचे स्वप्न आहे. तिच्या या उज्ज्वल यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी हर्षवर्धन मोरे, विस्ताराधिकारी साईनाथ वाळेकर, केंद्रप्रमुख क्रांती तापकीर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मयूर चव्हाण पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रभावती थोरवे तसेच एकसर, व्याहळी व म्हसवे येथील ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.








