धक्कादायक घटना : तीन वर्षीय मुलाचा गळा कापून खून

प्रतिनिधी – अमर शिवाजी पठारे

चाकण : तालुक्यातील खालुंब्रे परिसरात एक अत्यंत संतापजनक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अवघ्या तीन वर्षांच्या निरागस मुलाचा गळा कापून निर्घृण खून करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा शेजारी राहणारा सुमारे १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा असून, त्याने संबंधित बालकाला खेळण्याच्या बहाण्याने सोबत नेले. त्यानंतर त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करून धारदार शस्त्राने गळा कापून त्याची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेनंतर आरोपीने मुलाचा मृतदेह गोणीत भरून लपवण्याचा प्रयत्न केला. मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपीची हालचाल संशयास्पद दिसून आली.

त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली असता गोणीत मुलाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे.

या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Leave a Comment

Traffic Tail