प्रतिनिधी : अमर पठारे
वर्धा जिल्ह्यातील रोठा येथे अल्पवयीन चिमुकलीवर झालेल्या पाशवी अत्याचारानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेविरोधात विविध सामाजिक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करत दोषी आरोपीस कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रविंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिनिधीमंडळाने पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी कुटुंबीयांकडून घटनेची सविस्तर माहिती जाणून घेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर प्रतिनिधीमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत या प्रकरणी सविस्तर चर्चा केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वर्ध्याचे पालकमंत्री यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात सदर खटला फास्ट-ट्रॅक न्यायालयात चालवून नरसापूर प्रकरणाप्रमाणेच आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
या आंदोलनात युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र, ग्राहक पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटना, अखिल भारतीय मराठा महिला आघाडी तसेच संकल्प महिला मंच यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी वर्धा जिल्हाध्यक्ष प्रतिभा वाळके, जिल्हा उपाध्यक्ष माया वावरे, जिल्हा कार्याध्यक्ष रंजना जरोदे, जिल्हा संघटिका माधुरी वाघाडे, जिल्हा सहसंघटिका शालिनी गौरे यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सामाजिक संघटनांनी राज्य सरकारकडे पीडित कुटुंबाला तातडीने न्याय, आर्थिक मदत आणि दोषीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरजही यावेळी अधोरेखित करण्यात आली.









